Latest Marathi News

Trending Now

स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेणाऱ्या जानकरांची संपत्ती किती?;आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, अशी फकिरी आपल्याही वाट्याला यावी

0

 

परभणी प्रतिनिधी:
आपण फकीर माणूस असून लग्न
झालेले नाही,मला घर-दारदेखील नाही.
मी रेल्वे स्टेशनवर झोपू शकतो,असे सांगत
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे असलेली संपत्ती पाहून तुम्हाला
त्यांच्या गरिबीचा अंदाज येईल.
स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर हे
पाच कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक
असून विविध जिल्ह्यात त्यांच्या शेतजमिनी
आहेत. निवडणूक आयोगाकडे जानकर
यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातूनच ही
माहिती समोर आली आहे.

भाजपवर नाराज होऊन शरद पवारांना भेटून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले महादेव जानकर पुन्हा महायुतीकडेच गेले आणि महायुतीने त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांना जानकरांना फकिराची उपमा दिली होती. पाच वर्षे मंत्री राहूनही जानकरांनी कवडीचीही कमाई केली नाही.जानकर यांना कोठेच घरदार नाही. त्यांची कुठेही जमीन नाही. ते रेल्वे स्टेशनवरही झोपू शकतात,असे फडणवीस म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात ते काही खरे नाही. कारण महादेव जानकरांनाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनीच दाखल केलेल्या शपथपत्रातून समोर आले आहे. त्यामुळे फडवीसांनी परभणीकरांना जानकरांची सांगितलेली फकिरीचा ‘जुमला’च ठरली आहे.

महादेव जानकर यांच्याकडे चल आणि अचल अशी दोन्ही मिळून पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे. जानकरांच्या नावे १८ एकर १४ गुंठे जमीन आहे. ही जमीन सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी आहे. त्यांच्या नावे व्यावसायिक आणि निवासी संपत्तीदेखील आहे. रायगड,पुणे,अहमदनगर,मुंबई या ठिकाणी त्यांच्या नावे कमर्शिअल आणि रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आहे.महादेव जानकर यांनी त्यांच्याकडे ३ कोटी ६२ लाख ९९ हजार ७६० रुपये इतक्या किमतीची अचल संपत्ती असल्याचे घोषणापत्रात म्हटले आहे.

जानकर यांच्या पीपीएफ खात्यात २०१९-२० साठी दीडलाख रुपये, तर मार्च २०२४ मध्ये २ लाख २५ हजार ८४५ रुपये आहेत. जानकरांकडे २०० ग्रॅम सोन्या- चांदीचे दागिने आहेत. त्यांचे बाजारमूल्य १३ लाख ६५ हजार रुपये आहे. त्यांच्याकडे कॅश इन हँड २७ हजार ३३० रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात ५१ लाख ६६ हजार ७७९ रुपयांची एफडीआर केली आहे. गोल्ड बॉण्ड स्कीममध्ये त्यांनी ७९१ ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली आहे. त्याचे मूल्य २९ लाख ९६ हजार ३००८ रुपये आहे. सर्व चल संपत्ती १ कोटी २५ लाख १० हजार ५९८ रुपये आहे.

महादेव जानकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पळसवाडीचे रहिवासी आहेत.त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. जानकरांनी आपल्या शपथपत्रात शेती हा व्यवसाय दाखवला आहे.जानकरांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपले उत्पन्न नमूद केले आहे. त्यात २०२२-२३ मध्ये त्यांचे उत्पन्न ४० लाख १९ हजार ९९० रुपये, २०२१-२२ मध्ये ३१ लाख ३८ हजार ४० रुपये, २०२०-२१ मध्ये २७ लाख ४० हजार ७५० रुपये, २०१९-२० मध्ये ३१ लाख ७७ हजार ९४२ रुपये आणि २०१८-१९ मध्ये २६ लाख २६ हजार ६३९ रुपये इतके उत्पन्न दाखवले आहे.

महादेव जानकरांवर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नाहीत. त्यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा भाषण केल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी दाखल केलेला आहे.त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसल्याचेही या शपथपत्रात नमूद केले आहे.जानकरांना महाराष्ट्र शासनाकडून मलबार हिल येथे मुक्तगिरी बंगला आणि आकाशवाणी आमदार निवासामध्ये एक रुमदेखील देण्यात आली आहे….

Leave A Reply

Your email address will not be published.